Monday, December 23, 2019

युटोपियन शुगर्स च्या १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न




युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या २०१९-२० या गळीत हंगामातील १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन सोमवार दि. २३/१२/२०१९ रोजी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या  विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे, चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित  होता.
    यावेळी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा,बुलढाणा अर्बन को- ऑफ क्रेडिट सोसायटीच्या विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे यांचा सत्कार कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
      या वेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित परिषदे मध्ये पूर्वीची शिवनेरी अर्बन बँक व सध्याची पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे सो यांचे अभिनंदन युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी केले. या वेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,मागील दोन वर्षांपासून युटोपियन शुगर्स ला बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चांगले सहकार्य लाभले असून, भविष्यात ही असेच किंबहुना याही पेक्षा जास्त सहकार्य लाभेल अशी आशा वाटते. त्याच प्रमाणे त्यांच्या पुणे कमर्शियल बँकेनेही बँकिंग क्षेत्रामध्ये चांगले नाव कमविले असून त्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले आहे. बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे साहेब यांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. युटोपियन शुगर्स च्या वतीने  मी या बद्दल त्यांचे अभिनंदन करतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.
      पुढे बोलताना परिचारक म्हणाले की¸सध्या सबंध जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिति असून  कारखानदारी अडचणीत आहे.सर्वात जास्त साखर कारखाने असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात काही मोजकेच कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत. काही कारखाने कमी क्षमतेने चालविण्यात येत आहेत तर बहुतांश कारखाने बंद आहेत परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा युटोपियन शुगर्स ने आपल्या कामगिरीच्या जोरावर ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये अपेक्षित अशी कामगिरी करीत आहे. चालू गळीत हंगामा मध्ये ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. तसेच ऊस उत्पादकांनी ऊस दराबाबत
निश्चिंत राहावे एफआरपी पेक्षा ही जास्तीचा दर देण्याची आपली परंपरा युटोपियन या ही वर्षी कायम राखणार आहे.तरी ऊस उत्पादकानी आपला ऊस युटोपियन ला गाळपास देऊन कारखाना प्रशासनास सहकार्य करावे,तसेच ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही असे मत श्री परिचारक यांनी व्यक्त केले.
     
सत्काराला उत्तर देताना पुणे कमर्शियल बँकेचे  चेअरमन व बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की,सध्या महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी अडचणीत असून युटोपियन शुगर्स ने मात्र,अडचणीच्या काळातही आपली गुणवत्ता जपली आहे.त्यामुळेच या पुढील काळातही आम्ही या कारखान्यास करीत असणारे सहकार्य कायम ठेवणार असून युटोपियन शुगर्स सारखे ग्राहक आमच्या संस्थेस मिळणे ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे.   
   यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की दुष्काळी परिस्थितीवर मात करत युटोपियन शुगर्स  ने २६व्या दिवसा अखेर १,००,८०० मे.टन.इतक्या ऊसाचे गाळप करीत१०११११.इतके क्विंटल साखर उत्पादन केले आहे.तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८७ लाख इतके युनिट वीज निर्मिती केली असून  ५५.५० लाख युनिट इतकी वीज निर्यात केली आहे. सदरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी युटोपियन ची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमेतेने कार्यरत आहे.
फोटो ओळी :
१)       युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या २०१९-२० या गळीत हंगामातील १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन प्रसंगी बुलढाणा अर्बन कों-ऑफ क्रेडिट सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे कमर्शियल बँक,कोरेगाव या बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा, बुलढाणा अर्बन च्या विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे¸कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व इतर मान्यवर दिसत आहेत.
2)राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित परिषदे मध्ये पूर्वीची शिवनेरी अर्बन बँक व सध्याची पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे सो यांचे अभिनंदन करताना युटोपियन शुगर्स कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील दिसत आहेत.
(सर्व छायाचित्रे : सागर राजमाने)


Tuesday, December 10, 2019

शिकणार्‍यांसाठीचा धडा-भाऊ तोरसेकर

Image result for kumarswamy swearing in

कर्नाटक विधानसभेच्या १५ मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक महाराष्ट्रातील नव्या सरकारसाठी मोठा धडाच आहे. अर्थात धडा शिकणार्‍यांसाठी असतो. ज्यांना शिकायचा नसतो, त्यांच्यासाठी त्याचा काहीही उपयोग नसतो. महाराष्ट्रात आज जे सरकार सत्तेत आहे, ते अंकगणितावर आधारलेले सरकार आहे. त्याच्यापाशी निर्विवाद बहूमत आहे. दिड वर्षापुर्वी कर्नाटकातही अशीच स्थिती होती आणि निकालानंतर एक अंकगणिती लोकशाहीचे सरकार स्थापन करण्यात आलेले होते. तिथे सिद्धरामय्यांचे कॉग्रेस सरकार निवडणूकीला सामोरे गेले होते आणि त्याच्या पाच वर्षाच्या कारभारावर जनतेने आपले मतप्रदर्शन केलेले होते. त्यात कॉग्रेसला १२० हून अधिक आमदारांवरून ७८ इतके खाली यावे लागलेले होते. याचा अर्थ कॉग्रेस पक्ष सत्तेत नको, असाच स्पष्ट कौल मतदाराने दिलेला होता. पण भाजपाला सर्वाधिक जागा जिंकताना बहूमताचा पल्ला ओलांडता आलेला नव्हता. अशावेळी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या जनता दल सेक्युलर पक्षालाही कॉग्रेस विरोधातील मते मिळाली होती. म्हणूनच त्यांनी भाजपासोबत जाऊन जनतेला हवे असलेले बिगर कॉग्रेस सरकार देणे संयुक्तीक ठरले असते. पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह पडला होता आणि कॉग्रेसच्या निम्मे आमदार असूनही कॉग्रेसने कुमारस्वामी यांच्या जनता दल पक्षाला पाठींबा देऊन संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आमिष दाखवले. भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे हा त्यांचा किमान समान कार्यक्रम झाला आणि वर्षभर दोघे सत्तेत होते. यात भाजपाला काय वाटले, हा भाग वेगळा. जनतेला काय वाटले वा वाटते, त्याला महत्व असते.

आज महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे शरद पवार म्हणत आहेत, की मतदाराने भाजपाला इथल्या विधानसभेत नाकारले. नेमके तेच व तसेच शब्द त्यावेळी २०१८ च्या मे महिन्यात तमाम पुरोगामी बुद्धीमंत विश्लेषक वापरत होते आणि भाजपाला सत्तेबाहेर बसवण्याचे गुणगान करण्यासाठी देशातले तमाम विरोधी पक्ष नेते बंगलोरला जमलेले होते. हात उंचावून त्यांनी मतदाराला अभिवादन केले होते. तर मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधींचे पुण्यात्मा म्हणून गुणगान केलेले होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी डोळ्यांना रुमाल लावून श्रोत्यांसमोर रडत आपल्याला कॉग्रेसने कारकुन व चपरासी बनवून सोडले असल्याचे रडगाणे गायला आरंभ केला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे अजून सहा मंत्र्यांना आपापली खातीही वाटू शकलेले नाहीत. दोघांमध्ये कुठला गुणात्मक फ़रक आहे, तो प्रत्येकाने आपली बुद्धी वापरून शोधावा. पण दिड वर्षापुर्वी कर्नाटकात जे अंकगणित सोडवले गेले होते, ते फ़क्त दहा महिन्यातच तिथल्या मतदाराने पुसून टाकले. एकत्रित लढूनही कॉग्रेस सेक्युलर जनता दलाला लोकसभेच्या निवडणूकीत जमिनदोस्त करून टाकले होते. तिथून मग त्या पुरोगामी सरकारला घरघर लागली होती. मतदाराने नाकारलेल्या सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी त्या पुरोगामी सत्ताधारी गटातून आमदारांची पळापळ सुरू झाली. एक एक आमदार आपल्या पदाचा राजिनामा देऊन भाजपात सहभागी होण्यासाठी रांग लावू लागले. त्यांना रोखण्यासाठी कॉग्रेसने सुप्रिम कोर्टापासून सभापतींचे अधिकारही पणाला लावले. पण काय हाती लागले?

खरे तर निकालानंतर एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रकार नवा नाही. पण ज्या पक्षाच्या बाजूने मतदाराचा अधिक कौल आहे, त्यालाच बाहेर बसवून केलेल्या आघाड्या व युत्यांची सरकारे मतदाराने फ़ार काळ चालू दिलेली नाहीत, हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. त्याला दडपून विश्लेषण करता येते. पण ते सत्य ठरत नाही. जेव्हा बाजी मतदाराच्या हातात येते, तेव्हा तो कुठल्याही बलदंड पक्षाला धडा शिकवित असतो. त्याचीच कर्नाटकात प्रचिती आलेली आहे. वास्तविक लोकसभा निकालानंतर कुमारस्वामी सरकार विरोधातला जनमताचा कौल स्पष्ट झाला होता आणि तेव्हाच त्यांनी सत्तेचा मोह सोडायला हवा होता. पण कसेही करून सत्तेला चिकटून रहाण्यासाठी जी लाजिरवाणी धडपड या पक्षांनी केली; त्याची किंमत आता मोजली आहे. आमदार राजिनामे देऊन बाजूला झाल्यावर त्यांना जबरदस्तीने आपल्याच बाजूला राखण्यासाठी सुप्रिम कोर्ट व सभापती पदाचे अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. तरीही विश्वास प्रस्तावाचे नाटक तीन दिवस रंगवण्यात आले. तुम्ही बहूमत गमावलेले आहे, हे जगजाहिर होते. तरी कुमारस्वामी व सिद्धरामय्या यांनी त्या प्रस्तावावर चारचार तास भाषणे करून चार दिवस सरकार टिकवले. मजेची गोष्ट म्हणजे विश्वास प्रस्तावावर विरोधी भाजपाचा कुठलाही सदस्य चकार शब्द बोलला नाही आणि चर्चा तीन दिवस चालवली गेली. हा निव्वळ बेशरमपणा व लोकशाहीची केविलवाणी थट्टा होती. ती करण्यातून कॉग्रेस व जनता दलाने जी पत घालवली, त्याचेच प्रतिबिंब ताज्या निकालात पडलेले आहे. आज भाजपाचा विजय अजिबात झालेला नाही, त्यापेक्षा तो पुरोगामी लांडीलबाडीचा झालेला दारूण पराभव आहे,

सत्ता टिकवण्यासाठी व बळकावण्यासाठी कुठल्या टोकाला जाऊन पुरोगामी लोक युक्तीवाद करतात, त्यावरचा मतदाराने व्यक्त केलेला हा राग आहे. त्यात कर्नाटकच्या मतदाराने भाजपाच्या कामासाठी पाठ थोपटली असे नक्की म्हणता येणार नाही. पण सत्तालालसा पुरोगाम्यांची इतकी नागडी उघडी पडली, की त्यांच्या तुलनेत भाजपा बरा असेच मतदाराला वाटल्याचा हा निकाल आहे. कर्नाटकात तरी जनता दल व कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि दोघांना भाजपाच्या विरोधात मते मिळालेली होती. इथे महाराष्ट्रात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपाच्या सोबत महायुती म्हणून मते मागितलेल्या शिवसेनेने मतदाराच्या कौलाची थेट पायमल्ली केलेली आहे. तिथे भाजपा मोठा पक्ष असून त्याला सत्तेबाहेर बसवणारे दोघेही भाजपाच्या विरोधातले होते. इथे मतदाराला भाजपा सोबत सरकार बनवण्याचे आश्वासन देऊन लढलेली शिवसेनाच भाजपाला सत्तेबाहेर बसवण्यासाठी दोन्ही कॉग्रेसशी हातमिळवणी करून बसलेली आहे. मग उद्धवरावांनी आपल्या वडीलांना दिलेला शब्द जरूर पाळला आहे. पण कालपरवा आक्टोबर महिन्यात मतदाराला दिलेल्या शब्दाचे काय? त्याच्या विश्वासाची पायमल्ली केलेली नाही काय? तो मतदार टेलिव्हीजनच्या स्टुडीओत येऊन प्रतिवाद किंवा युक्तीवाद करत नसतो. पण प्रत्यक्ष मतदान असते, तेव्हा तो आपला हिसका दाखवतो. म्हणूनच आज निकाल कर्नाटकातील पोटनिवडणूकांचे लागलेले आहेत. पण त्यात महाराष्ट्रातील विविध पक्षांसाठी मोठाच धडा सामावलेला आहे. ती येऊ घातलेल्या भविष्याची चाहूल असते. पण कान बंद करून बसलेल्यांना आक्रोश कुठून ऐकू येणार म्हणा.

Saturday, November 23, 2019

युटोपियन शुगर्स चे मोळी पूजन संपन्न


युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते आज शनिवार दि. २३/११/२०१९ रोजी गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. सुरूवातीस  युटोपियन शुगर्स चे चिफ अकौंटंट श्री. मुकेश रोडगे व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी रोडगे या उभयतांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा व गव्हाणी चे पूजन करण्यात आले या प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे, बाळदादा काळुंगे,भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे, दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर, यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.
     यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्स चा हा सहावा गळीत हंगाम असून या वर्षी पुरेसा व योग्य पाऊस न झाल्याने  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ऊस लागवडी चे क्षेत्र कमी होऊन गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा ऊसाची उपलब्धता कमी आहे परंतु ऊस उत्पादकांचा विश्वास व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर युटोपियनच्या शेती विभागाकडे  अपेक्षित ऊसाची नोंद झाली आहे,गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखाना चार महीने सुरू राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
     पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,मागील सर्वच गळीत हंगामात युटोपियन ने एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत एक वेगळा आदर्श निर्माण केला असून,पुढील काळामध्येही ही परंपरा कायम राखणार आहोत.या भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील सर्व ही हंगामामध्ये युटोपियनला ऊस गाळपास देऊन सहकार्य केले होते,व या पुढील काळातही आपला सर्व ऊस युटोपियन ला गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही परिचारक यांनी केले. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक व कर्मचारी या सर्वांना गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.      
            यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० साठी तांत्रिक तयारी पूर्ण केली असून कारखान्याचा उत्पादन विभाग,यांत्रिक विभाग,हा गाळप हंगामास तयार असून अपेक्षित उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चालू हंगाम हा आव्हानात्मक असून त्यासाठी व्यवस्थापनाने पूर्ण तयारी केली आहे कारखाना आधुनिक तंत्रज्ञाना च्या जोरावर कारखाना गाळप उद्दीष्ट निश्चित पूर्ण करेल. तसेच  सध्या दुष्काळी परिस्थिति असल्याने कारखानदारी अडचणीत आहे त्यामुळे कारखाना काटकसरीने चालविण्यासाठी युटोपियन प्रयत्नशील आहे.कारखाना ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून ऊस उत्पादकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढावी या करिता ऊस बेणे,खाते,ठिबक सिंचन,व प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादना करिता वेळोवेळी तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच कारखान्याचा  नव्याने उभारण्यात आलेला आसवनी प्रकल्प योग्य रीतीने चालू असून त्याचा फायदा ऊस उत्पादकांना भविष्यात जास्तीचा दर देण्यासाठी होणार आहे. सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.
फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि. पंत नगर कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी मोळी पूजन करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे,बाळदादा काळुंगे,दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी वर्ग आदि दिसत आहेत .

Friday, November 22, 2019

सत्तास्थापनेस“चकवा” शहा - फडणवीस यांची खेळी यशस्वी


महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी लागणारा “१४५” चा आकडा गाठता आला नाही.या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा व मित्र पक्ष यांनी “महायुती” च्या माध्यमातून तर कोंग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांनी “आघाडी” च्या माध्यमातून निवडणूका लढवल्या.निवडणूक निकाल लागल्या नंतर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली ती म्हणजे “सरकार बनवण्यासाठी शिवसेनेचे सर्व पर्याय खुले”आणि या ठिकाणीच खर्‍या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संघर्षास सुरुवात झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे मीडिया वर दररोज त्याच त्या वक्तव्याने नवीन  राज्यातील जनता रोजच नवनवीन अंदाज बांधत होती.सुरुवातीची अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द अमित शहा यांनी मातोश्री वर येऊन दिला होता. आता तो पाळलाच पाहिजे. सत्तेत समान वाटा व पद ही समान देण्याचे अमित शहा यांनी मान्य केले होते. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र त्याच वेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्या बाबत चर्चा झालीच नाही असे भारतीय जनता पार्टी,देवेंद्र फडणवीस व दस्तुरखुद्द अमित शहा यांनी जाहीर केले. त्यामुळे सत्ता संघर्षाची तीव्रता अधिकच वाढली. उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसैनिकलाच बसवणार हा शब्द दिला आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत आता माघार नाही असे सांगत आपल्या अस्तित्वाचा मुद्दा केला. त्यांनी भारतीय जनता पक्षा सोबत असणारे अनेक वर्षांचे संबंध संपुष्टात आणत केंद्रीय मंत्री मंडळात समाविष्ट असणारे शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यास सांगितले.तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी अधिकच वेग घेतला होता.राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी जवळीक साधत कोंग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्या करिता विचारणा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली. शरद पवार यांनी स्वत: कोंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति बाबत माहिती देऊन भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापणे पासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे जुळवावी लागतील असे सांगत सोनिया गांधी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता कट्टर हिंदुत्ववादी असणार्‍या शिवसेने बरोबर आघाडी करण्या करिता कोंग्रेस पक्षात वेग वेगळे मत प्रवाह होते. अनेक कोंग्रेस नेते यांचा या आघाडीला विरोध होता. मात्र, पवार साहेब यांनी केली जुळवा जुळव व सत्तेत समाविष्ट होण्या करीता आतुर झालेले काही आमदार यांच्या मर्जी खातर किमान समान धोरणावर महाआघाडीचे गणित जुळले. भारतीय जनता पक्षाने या आघाडीस शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षांच्या बहुतांश नेत्यांनी या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुत्सद्देगिरी करीत आपला प्लॅन शेवट पर्यन्त ओपन केला नाही. परंतु,सत्ता स्थापने मध्ये गर्क असणारे शिवसेना नेते यांच्या डोळ्यासमोर फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्चीच होती त्यामुळे त्यांची नजर मर्यादित झाली होती. आणि नेमके याच संधीचा फायदा भारतीय जनता पार्टी ने घेतला आहे. “रात्रीस खेळ चाले”या उक्ती प्रमाणे भारतीय जनता पक्ष हा आपले सर्वच “सर्जिकल स्ट्राईक” रात्रीस खेळण्यात पटाईत आहेत.अजित पवार यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस ला सोडून भाजपा ला समर्थन देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिवसेनेच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राज्यातील राजकारणे वेगळीच दिशा घेतली असून सुप्रिया सूळे यांनी आमचा पक्ष यांनी घर फुटले असल्याचे संगितले आहे.
आता पुढील हालचालींवर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टी आहे . मात्र शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
असे असले तरी शरद पवार यांनी दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकरी प्रश्नासाठीभेट घेतली होती ,मात्र यावर खरोखरच नेमकी शेतकरी प्रश्नावरच चर्चा झाली होती का असा प्रश्न निर्माण होतोय.येणर्‍य काळात अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष कारवाई करेल ,मात्र महाआघाडीच्या सत्ता स्थापनेस व शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदास ब्रेक लागला आहे. एकंदरीत सत्ता स्थापनेस चकवा बसला आहे आणि फडणवीस व अमित शहा यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. “मी पुन्हा येईन” म्हणणारे फडणवीस “पुन्हा आले आहेत”इतकेच... 



Monday, November 18, 2019

युटोपियनचे शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न







युटोपियनचे शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक
 मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्या च्या २०१९-२०२० या सहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवार दि.१४/११/२०१९ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ह.भ.प.मदन महाराज हरीदास,युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
     सुरूवातीला कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री.महेश निंबाळकर यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
     यावेळी बोलताना युटोपियन शुगर्स चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा सहावा गळीत हंगाम असून  सुरुवाती पासूनच ऊस उत्पादकांच्या हितास प्राधान्य देण्याचे काम युटोपियन शुगर्स ने केले आहे. त्यामुळेच आम्ही ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.भविष्यामध्ये या कारखान्याचा कणा असणारे ऊस उत्पादक व कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून भविष्यामध्ये अनेक लाभदायी योजना राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.मागील गळीत हंगाममध्ये ऊसाची उपलब्धता प्रचंड होती. परंतु चालू वर्षी दुष्काळी परिस्थिति असल्याने ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणावर आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर अडचणी आहेत त्यासाठी कारखाना काटकसरीने चालविणे ही काळाची गरज आहे.अशा परिस्थितीत ही युटोपियन ने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला असल्याने चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद कारखान्याचे संस्थापक-चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केला.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युटोपियन शुगर्स  चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.

फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन पूजन करताना पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प.मदन महाराज हरीदास, चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग दिसत आहे.

Saturday, March 9, 2019

युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळप पूर्ण,कामगारांना देणार १५ दिवसाचा बक्षीस पगार :- उमेश परिचारक


युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळपपूर्ण,कामगारांना देणार १५ दिवसाचा  बक्षीस पगार :- उमेश परिचारक
गळीत हंगाम २०१८-२०१९ चा सांगता समारंभ संपन्न
मंगळवेढा:- युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने चालू गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये मागील ४ वर्षाचा विक्रम मोडीत काढत उच्चांकी कामगिरी केली आहे. कारखान्याने १३७  व्या दिवसा अखेर ६३२३११ मे.टन ऊसाचे गाळप करीत सरासरी १०.१५ % इतक्या साखर उतार्‍यासह ६४१६०० क्विंटल इतके साखर उत्पादन केले आहे. तसेच को-जन प्रकल्प अद्याप ही चालू असून दिनांक ०८/०३/२०१९ अखेर प्रकल्पातून ४.९१.कोटी यूनिट वीज निर्मिती करून ३.२४. कोटी यूनिट इतकी वीज निर्यात केली आहे.कारखान्याच्या या विक्रमी कामगिरीमध्ये कामगार वर्गाचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांना १५ दिवसांचा पगार हा बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन मा.श्री उमेश परिचारक यांनी केली  .
   प्रारंभी युटोपीयन चे डेप्युटी चीफ केमिस्ट श्री दीपक भगवान देसाई यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण पुजा करण्यात आली. कार्यक्रमाचा गाजवजा न करता युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील आदींच्या शुभहस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून गळीत हंगाम २०१८-२०१९ ची सांगता करण्यात आली. सदर प्रसंगी सर्व खाते प्रमुख,अधिकारी, कर्मचारी,ऊस उत्पादक,तोडणी-वाहतूकदार उपस्थित होते.
     स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे  संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, ऊस उत्पादकांना भेडसावणारा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युटोपीन ची निर्मिती करण्यात आली.गळीत हंगामाच्या सुरूवातीस ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती. मात्र.,हुमणी मुळे बर्‍याच ऊस उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होऊन ऊस क्षेत्रा मध्ये ही मोठ्या प्रमाणात घट झाली. अशा ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याच्या वतीने तातडीने विविध प्रकारची औषधे,खते, तसेच प्रशिक्षण देण्यात आले होते. चालू वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिति असतांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्यवस्थापन तसेच कार्यक्षम शेती विभाग,ऊस उत्पादक व कर्मच्यार्‍यांच्या योगदानामुळेच चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळप करीत युटोपियन शुगर्स ने एक नवा विक्रम निर्माण केला आहे. कारखान्याची निर्मिती ही मुळातच ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन केलेली असल्याने कारखान्याने मागील चार ही वर्षी एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर दिलेला आहे.चालू वर्षी केंद्र शासनाने साखर कारखान्यांना मदत करण्याच्या उद्देशाने साखरेची किमान  विक्री किंमत जाहीर केली सध्या MSP ( Minimum Selling Price ) ३१०० रुपये अशी आहे मात्र. चालू वर्षी साखरेचे अधिकचे उत्पादन झाल्याने बाजार पेठेत साखरेस समाधान कारक मागणी नाही. तरीही युटोपियन ने जानेवारी २०१९ अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता २००० रु.प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केला आहे. उर्वरित बिलाची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे युटोपियन शुगर्स हा ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन योग्य तो दर देण्यास नेहमीच प्रयत्नशील असतो. तसेच हंगाम यशस्वी करण्यामध्ये कामगार वर्गाचे योगदान महत्वाचे असल्याने कामगारांना प्रोत्साहनात्मक बक्षिस म्हणून १५ दिवसाचा पगार देणार असल्याचेही  परिचारक यांनी जाहीर केले. तसेच कारखाना तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित चालविल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा कारखाना प्रशासन व कर्मचारी वर्ग यांचे वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
      यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, शून्य पाणी वापर तत्वावर आधारीत नावीन्यपूर्ण अशा पांडुरंग परिवारातील एक घटक असणार्‍या युटोपियन शुगर्सने आपल्या कामगिरीतून अल्पावधीतच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केल्याने व  ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने परिसरातील व परिसरा बाहेरील ऊस उत्पादकांनी सुद्धा यूटोपीयन ला गाळपास ऊस उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याने एवढे विक्रमी गाळप आम्ही करू शकलो.चालू गळीत हंगामात ७ लाख.मे.टन ऊस गाळप करण्याचा आमचा मानस होता.परंतु पावसाची अनिश्चितता व त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितिमुळे ऊसाची उपलब्धता कमी झाली व सरासरी उत्पादन ही चालू गळीत हंगामामध्ये कमी झाले आहे. तरीही ऊस उत्पादकांचे नुकसान होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेत नोंदी प्रमाणे ऊस गाळपास आणून सदरचे उच्चांकी गाळप पूर्ण करण्यात आले.  चालू गळीत हंगाम च्या सुरूवातीला कारखान्यांच्या तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये अल्पसा बदल करून आधुनिकीकरण केले त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षमते मध्ये लक्षणीय वाढ झाली त्याच्या फायदा घेत युटोपीयन ने गत हंगामा पेक्षा सरासरी ६९१ मे.टन. प्रतिदिवस या प्रमाणे जास्तीचे गाळप चालू हंगामात केले.केंद्र शासनाच्या धोरणास अनुसरून इथेनोल निर्मिती करीता कारखान्याने बी- हेवी मळी ची निर्मिती केली आहे. त्यामुळे गत हंगामा पेक्षा चालू गळीत हंगामा मध्ये रिकव्हरी अल्पशी कमी झाली आहे. हा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार,यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांचे आभार मानत पुढील काळात ही त्यांचे असेच सहकार्य लाभेल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच ४५ केएलपीडी क्षमतेच्या आसवानी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या शून्य पाणी वापर तत्वावरील नावीन्यपूर्ण अशा आसवानी प्रकल्पाचे लवकरच उदघाट्न करून प्रकल्प कार्यान्वित करणार असून या प्रकल्पा मुळे भविष्यात ऊस उत्पादक यांना चांगला फायदा होणार असल्याचे मत ही पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.तसेच पुढील वर्षी युटोपियन शुगर्स कडून निडवा पिकासाठी १०० रुपये प्रती टन अनुदान  देण्यात येणार असल्याची माहिती श्री.पाटील यांनी दिली.
 यावेळी सर्वाधिक प्रथम ३ क्रमांकाचे तोडणी व वाहतूकदार यांचा सत्कार करण्यात आला.

Thursday, January 31, 2019

महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स च्या खेळाडुंचे यश


  
 मोडनिंब ता.माढा येथे दिनांक २७/०१/२०१९ रोजी झालेल्या द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून विविध पदकांची कमाई करत यश संपादन केले. तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तूरा रोवला.यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे,यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंना आमदार चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी  उद्योजक किसन आप्पा जाधव यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
   सदर स्पर्धेतील खेळाडूंच्या यशाबद्दल युटोपियन शुगर्स चे मार्गर्शक तसेच जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व युवानेते प्रणव मालक परिचारक यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,सर्व अधिकारी,खातेप्रमुख,क्रीडा प्रशिक्षक श्री. अनिल मंडले आदि उपस्थित होते. 
स्पर्धेतील गुणवंत खेळाडू पुढील प्रमाणे:
अनिकेत फाळके-(४० कि.वजनी गटातून)(प्रथम)     तन्मय पाटील -(३० कि.वजनी गटातून) द्वितीय
दादा दरविषे –-(२५ कि.वजनी गटातून) (प्रथम)      अमर पांढरे -(३० कि.वजनी गटातून) तृतीय
कु.पूनम माने--(३०कि.वजनी गटातून) (प्रथम)       तन्मय पाटील-(३२कि.वजनी गटातून) द्वितीय
अभिजीत गिरमे -(३० कि.वजनी गटातून)द्वितीय    श्रेयस पाटील -(३९कि.वजनी गटातून) द्वितीय
माऊली जाधव-(४४कि.वजनी गटातून) तृतीय     वेदान्त पाटील -(२४ कि.वजनी गटातून) चतुर्थ    सुदर्शन भोसले -(३७कि.वजनी गटातून) द्वितीय  समाधान भुसनर -(५८ कि.वजनी गटातून) तृतीय  अनिकेत बोंबाळे -(५०कि.वजनी गटातून) तृतीय

फोटो ओळी;  द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करताना सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व युवानेते प्रणव मालक परिचारक दिसत आहेत. 

Friday, January 18, 2019

कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक


    कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक
प्रशालेचा प्रथम वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
       पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याने मंगळवेढा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीस सुरुवात झाली असून प्रशालेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे प्रतिपादन पांडुरंग प्रतिष्ठान च्या संचालिका सौ. सीमाताई प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. त्या कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा दिनांक 17/01/2019 रोजीच्या प्रथम वार्षिक  स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. 
    प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सौ.सीमाताई परिचारक यांच्या शुभहस्ते तसेच युटोपीयन शूगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या सुविद्यपत्नी सौ.विजयाताई पाटील,कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर.माधवीताई हवालदार प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे,तनिशा पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
      सदर प्रसंगी बोलताना सौ. परिचारक म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने शैक्षणिक प्रगति बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आयोजित केलेले स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आदर्श समाज व्यवस्था घडविण्यासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल असून कर्मयोगी विद्यानिकेतन चे हे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रशालेने अल्पावधीतच  एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत ही सौ.परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर म्हणल्या की मागील 25 वर्षाहून ही अधिक काळ मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. विविध संस्था मध्ये मी कार्य केले आहे. मात्र, पांडुरंग परिवारामधे परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या सर्व संस्था या समाजाला वेगळी दिशा देत आहेत आदर्शसंस्था म्हणून या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेने अल्पावधीतच आयोजित केलेला हा कार्यक्रम व त्याकरीता आयोजित केलेली व्यवस्था पाहून आयोजकांच्या कामाची कार्यपद्धती आदर्शवत असल्याचे दिसून येते याचा आम्हास अभिमान वाटतो.
            यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कोळी गीत,धनगरी-गीत,लावणी,महाराष्ट्राची लोकधारा,हिन्दी,मराठी,सिनेमा गीते,बाल गीते इत्यादि प्रकारच्या कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तर उपस्थित प्रेक्षकांनी ही भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मनमुराद दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शिंदे,अनीता होणराव आदींनी केले. तर आभार प्रशालेच्या प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे यांनी मानले.
 युटोपियन शुगर्स च्या वतीने महिलांकरिता दर वर्षी प्रमाणे मकर संक्रांती निमित्ताने हळदी-कुंकू व तीळ गूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थी,पालक,उपस्थितीत सर्व महिला वर्ग आदीं करीता युटोपियन परिवाराच्या वतीने स्नेह भोजनाची सोय करण्यात आली होती. उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन संयोजकाकडून करण्यात आलेल्या चोख नियोजन व्यवस्थेचे कौतुक केले.