Monday, November 21, 2022

युटोपियन शुगर्स लि. कडून गळीत हंगाम २०२२-२३ चा पहिला हप्ता २४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग :- उमेश परिचारक

कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या  कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. सदरच्या ऊस बिलाची रक्कम ही ऊस उत्पादक यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आली  असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. याविषयी बोलताना परिचारक म्हणाले की गळीत  हंगाम २२-२३ मध्ये उसाची उपलब्धता चांगली आहे. युटोपियन शुगर्स कडे पहिल्या पंधरवड्याचे अखेर गाळप झालेल्या ऊसाचे बिल आम्ही देत असून कारखान्याने या पूर्वीच जाहीर केल्या नुसार ऊसाच्या ८६०३२ या जातीस १०० रु. जास्तीचा दर  देण्याच्या उद्देशाने प्रती मे.टन २४०० रु. प्रमाणे तर को- २६५ या जातीच्या ऊसास प्रती मे.टन २३०० रु प्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता देत असल्याची माहिती ही परिचारक यांनी दिली.

युटोपीयन शुगर्स सध्या प्रती दिन ५२०० मे.टन या गाळप क्षमतेने चालू असून कारखान्यास चालू गळीत हंगामात विक्रमी गाळप होण्याची अपेक्षा आहे. त्या नुसार कारखान्याची सर्व यंत्रणा कार्यरत आहे
 

Monday, October 17, 2022

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील ऊसास देणार २०० रु, कामगारांना १२.५०% दिवाळी बोनस तर चालू गळीत हंगामात ७.५१ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम . चेअरमन उमेश परिचारक यांची महत्वपूर्ण घोषणा.



 युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील ऊसास देणार २०० रु, कामगारांना १२.५०% दिवाळी बोनस तर चालू गळीत हंगामात ७.५१ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम . चेअरमन उमेश परिचारक यांची महत्वपूर्ण घोषणा.

मंगळवेढा प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याकडे मागील गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन २०० रु.प्रमाणे ऊस दर देणार असून कर्मचारी बांधवांचे कारखाना उभारणीत योगदान महत्वाचे असते. त्यांची दिवाळी ही गोड व्हावी या करीता त्यांना ही १२.५० टक्के दिवाळी बोनस देणार आहे. एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली आहे.

युटोपियन शुगर्स च्या ९ व्या व गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांचे समवेत सर्व खाते प्रमुख,कर्मचारी व कामगार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पूढे बोलताना परिचारक म्हणाले की, कारखाना ९ व्या गळीत हंगामास पूर्ण क्षमतेने सामोरे जात आहे. मागील वर्षी युटोपियन ने उच्चांकी गाळप केले होते.चालू वर्षी कारखान्याने विस्तारीकरण करून प्रतिदिनं ५२०० मे.टन गाळप करण्याचा मानस ठेवला आहे.सर्व यंत्रणा अद्यावत करण्यात आली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे चालू गळीत हंगाम ८ -१० दिवस उशिराने चालू होत आहे. खरीपाची पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणात सततच्या पावसामुळे ऊस उत्पादक वर्गाचे नुकसान कमी आहे. हंगामाच्या सुरूवातीला जास्तीचा पाऊस झाल्याने रिकव्हरी कमी लागत असते. तरी सुद्धा चालू गळीत हंगाममध्ये मागील सर्व गाळपाचे रेकॉर्ड मोडीत काढून नवा उच्चांक प्रस्थापित करण्याचा आमचा मानस असून चालू गळीत हंगामा करीता ७ लाख ५१ हजार मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. तसेच केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या इथेनॉल बेल्ण्डींग कार्यक्रमा मध्ये आपल्या कारखान्याने सहभाग घेतलेला आहे. चालू गळीत हंगामा मध्ये प्रतीदिन ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादन करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त करतानाच मागील गळीत हंगामा मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रती मे.टन २०० रु.प्रमाणे दिवाळी भेट म्हणून देणार आहे. कारखान्याने या पूर्वीच २१०० रु प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक यांना अदा केलेली आहे. कारखान्याची एकूण एफआरपी ही २१८० रु. आहे . त्यामुळे मागील गळीत हंगाम मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे.टन १२० रु. इतका दर हा एफआरपी पेक्षा जास्तीचा दर होत आहे. या मुळे कारखान्याने एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. तसेच कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी कामगार वर्गाची भूमिका महत्वाची असते. त्यांची ही दिवाळी गोड व्हावी या करीता १२.५०% दिवाळी बोनस देण्यात येणार  आहे. तसेच ऊस उत्पादक यांनाही दिवाळी करीता सवलतीच्या दरात युटोपियन च्या सर्व विभागीय कार्यालातून साखर वाटप करण्यात येणार असल्याचे ही परिचारक यांनी सांगितले

सततच्या पावसामुळे अत्यंत साधेपणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

फोटो ओळी :- युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२०२३ या ९ व्या गळीत हंगामा चा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी,ऊस उत्पादक,तोडणी मजूर, वाहतूक, ठेकेदार आदी दिसत आहेत.

छाया :- सागर राजमाने

Thursday, June 16, 2022

कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ बहरले विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने…


 

युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी तालुका मंगळवेढा या कारखान्याच्या प्रांगणात असणाऱ्या श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ या प्रशालेचा शैक्षणिक वर्ष 2022-2023 मधील दिनांक 15 जून चा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू झाला. काही रुसलेले तर, काही फुललेले चेहरे ,तितकेच निरागस आणि नव-नवीन निष्पाप भावनेचे प्रतिबिंब असलेले चेहरे. गेली दीड - दोन महिने बंद असणारी  शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली.विद्यार्थांचा उत्साह व रूसलेला चेहरा पाहताना पालक व शिक्षक वर्ग ही भावुक झालेले दिसून आले.  पालकांनी आपल्या पालकांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची दोरी तितक्याच विश्वासाने कर्मयोगी विद्यानिकेतन च्या शिक्षकांच्या हाती सोपवली आहे.

अल्पावधीतच मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागांमध्ये नावारूपाला आलेल्या कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेने  मागील पाच ते सहा वर्षांमध्ये विद्यार्थ्यांशी व पालकांशी एक विश्वासाचे,गुणवत्तेचे व उत्तम असे  संस्काराचे  नाते निर्माण केले असून आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सर्वच संस्था आपली वेगळी ओळख निर्माण करून कार्यरत आहेत. कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशाले मध्ये जूनियर के-जी ते पाचवी पर्यंत चे वर्ग आहेत. उत्तम शिक्षण - योग्य संस्कार, व उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, प्रशस्त व निसर्गरम्य परिसर, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा, अद्यावत अशा नियोजनामुळे शाळेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती प्र. मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे यांनी दिली शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या शिक्षिका यांनी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, पताके,  फुले व सर्वत्र असणारे फुगे यामुळे शाळेचे वातावरण अत्यंत चैतन्यमय असे दिसून येत होते.

फोटो : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करताना शिक्षिका दिसत आहेत. 

Wednesday, January 26, 2022

युटोपियन शुगर्स देणार कामगारांना 12 टक्के वेतन वाढ ,प्रतिदिन गाळप क्षमता ही वाढवणार -उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स देणार कामगारांना 12 टक्के वेतन वाढ ,प्रतिदिन गाळप क्षमता ही वाढवणार -उमेश परिचारक
मंगळवेढा प्रतिनिधी:-
युटोपियन शुगर्स लि.आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला 12 टक्के वेतन वाढ करणार असून पुढील काळात प्रतिदिन गाळप क्षमतेमध्येही वाढ करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कारखान्याचे संस्थापक उमेश परिचारक यांनी केली.
युटोपियन शुगर्स लि. येथे  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात परिचारक बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, सी.एन. देशपांडे, महादेव लवटे, सुरेश टीकोरे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी ,कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,
युटोपीयन शुगर्स या कारखान्याची उभारणी ही मुळातच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे असणाऱ्याअतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागावा व या मंगळवेढ्या सारख्या कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळावी तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने झालेली आहे. कारखान्याचा सध्याचा आठवा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालू आहे मागील सात ही गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केल्याने चालू गळीत हंगामामध्ये कारखाना आपले अपेक्षित उद्दिष्ट निश्चित पूर्ण करेल. युटोपीयन शुगर्स कडे ऊस पुरवठा करण्यासाठी अनेक ऊस उत्पादक इच्छुक आहेत मात्र ऊस गाळपाची सध्याची क्षमता ही मर्यादित असल्याने ऊस उत्पादकांना थोडा जास्तीचा वेळ ऊस तोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. प्रत्येक ऊस उत्पादकास आपल्या उसाचे गाळप लवकर व्हावे असे वाटते आहे.मात्र, योग्य त्या नियोजनानुसार सर्वांच्या ऊसाचे गाळप करणार असून कारखान्याकडे असलेल्या नोंदीतील सर्व ऊसाचे गाळप केल्याशिवाय गळीत हंगामाची सांगता करणार नसून ऊस उत्पादक यांची ऊस गाळपाची अडचण ओळखून येत्या काळात कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमतेमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर करण्याबरोबरच कारखान्याच्या प्रगती मध्ये कामगार वर्गाचे असणारे योगदान विचारात घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला 12 टक्के वेतन वाढ जानेवारी 2022  पासून देणार असल्याची घोषणाही परिचारक यांनी केली व उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन अभिजीत यादव यांनी केले

Tuesday, January 4, 2022

युटोपियन शुगर्स १.६२ कोटी लिटर इथेनॉल चा पुरवठा करणार , रिकव्हरी ९.५७% वर : रोहन परिचारक

 

युटोपियन शुगर्स १.६२ कोटी लिटर इथेनॉल चा पुरवठा करणार , रिकव्हरी ९.५७% वर : रोहन परिचारक

युटोपियन शुगर्स लि. कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये ६.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धीष्ट ठेवले आहे. कारखान्याने दि.२ जानेवारी २०२२ अखेर ३,११,००० मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याचे केंद्र शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रीय स्तरावरील इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम  मध्ये सहभाग घेतला असून सुमारे १.६२ कोटी लिटर  इथेनॉल चा पुरवठा पेट्रोलियम कंपन्या यांचे कडे करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी दिली.

कारखान्याने पेट्रोलियम कंपनी यांचेकडे १.६४ कोटी लिटर ची निविदा भरलेली होती. ऊसाच्या रसापासून  इथेनॉल  निर्मिती व पुरवठा करणे कामी ४१ लाख लिटर इतक्या निविदेस मान्यता दिली आहे तसेच बी-हेवी मोलॅसेस पासून सुमारे १.२१ कोटी लिटरचा पुरवठा हिंदुस्थान पेट्रोलियम,भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनी यांचेकडे करण्यात येणार आहे. आता पर्यंत सुमारे २६ लाख लिटर चा इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे. ऊसाच्या रसापासून  इथेनॉल निर्मिती करताना १.३० इतकी रिकव्हरी खर्च होत आहे. तसेच बी हेवी मोलॅसेस पासून १.३५ टक्के इतकी रिकव्हरी खर्च होत आहे त्यामुळे सध्याचा साखर उतारा हा ६.९२ आहे व एकत्रित मिळून साखर उतारा ९.५७%  इतका प्राप्त होत आहे. इथेनॉल विक्री मधून मिळणार्‍या रकमेमधून ऊस उत्पादक यांना वेळेत ऊस बिल रक्कम अदा करणे पुढील काळात शक्य होणार आहे. कारखान्याच्या वतीने  जानेवारी व फेब्रुवारी मध्ये लवकरच प्राप्त होणार्‍या ८००५ व ८६०३२ या जातीच्या बेण्यावर प्रती एकरी ५०% अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती ही श्री.परिचारक यांनी दिली