Friday, December 3, 2021

कै. नवनाथ लुगडे यांच्या कुटुंबीयांना युटोपियन शुगर्स ची मदत




मंगळवेढा प्रतींनिधी : युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे सेवक कै.नवनाथ किसन लुगडे रा. हाजापूर ता. मंगळवेढा याचे दिनांक १३/१२/२०२० रोजी दु:खद निधन झाले होते. कै. नवनाथ लुगडे हा मनमिळावू व कार्यतत्पर म्हणून युटोपियन शुगर्स व परिसरामध्ये परिचित होता.त्याचा निधनाने युटोपियन शुगर्स मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून ती आज तागायत भरून निघाली नाही.  कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने त्याच्या निधना नंतर त्याच्या कुटुंबाची परवड होऊ नये या उद्देशाने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स च्या वतीने नवनाथ लुगडे यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली

        कै. नवनाथ लुगडे हा युटोपियन शुगर्स येथे मागील ५ वर्षा पासून सेवक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कार्यकाळा मध्ये त्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून सेवा बजावत असताना प्रत्येक कार्यात तो हिरारीने अग्रभागी असायचा. अनेक बचत गटाच्या माध्यमातून त्याने हाजापूर व पाटखळ मध्ये मोठा जनसंपर्क विस्तारला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे. युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून लुगडे याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परवड होऊ नये या सामाजिक उद्देशाने युटोपियन शुगर्स व सर्व कर्मचारी यांनी १ दिवसाचा पगार देऊ केला  आहे. तसेच भविष्य निर्वाह निधि सह एकत्रित रक्कम सुमारे ६.५०,००० रुपये व लुगडे यांच्या २ कन्या व पत्नी यांना पेन्शन योजनेचा लाभ ही कारखान्याच्या सहकार्यातून मिळवून दिला आहे.कारखान्याच्या वतीने देण्यात येणार्‍या रकमेची कारखान्याने ठेव ठेवली असून आज त्या ठेवीच्या प्रमाण पत्रांचे प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी कै. नवनाथ लुगडे याच्या घरी जाऊन कारखान्याचे चिफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांच्या हस्ते व हाजापूर चे माजी सरपंच माधवानंद आकळे,दिलीप लुगडे सोमनाथ लुगडे,अर्जुन लुगडे यांच्या उपस्थितीत कै. लुगडे यांच्या पत्नी श्रीमती कोमल व आई श्रीमती सखूबाई लुगडे यांच्या कडे सुपूर्द केल्या.   

फोटो ओळी : युटोपीयन शुगर्स लि. च्या वतीने कै. नवनाथ लुगडे यांच्या पत्नी श्रीमती कोमल व आई श्रीमती सखूबाई लुगडे यांना आर्थिक मदत सुपूर्द करताना कारखान्याचे चिफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे समवेत हाजापूर चे माजी सरपंच माधवानंद आकळे,दिलीप लुगडे सोमनाथ लुगडे,अर्जुन लुगडे आदि दिसत आहेत.

 

Tuesday, November 9, 2021

ए.एम स्पोर्ट्स डोणज ता. मंगळवेढा आयोजित खुला गट खो - खो स्पर्धेत वेळापूर, सोलापूर ,मंद्रूप संघास विजेतेपद

 


मंगळवेढा प्रतींनिधी :- कै. अंबीर मुलाणी यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त दि .०६.११.२०२१ रोजी जि. प. प्रा. शाळा डोणज  येथे पार पडलेल्या भव्य खुला गट खो- खो स्पर्धेत ए .एन वेळापूर संघास प्रथम क्रमांक, उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर संघास  व्दितीय क्रमांक, दिनबंधू मंद्रूप संघास  तृतीय क्रमांक  तर न्यू गोल्डन क्लब, मंद्रूप संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठीचा सामना ए .एन वेळापूर विरुद्ध उत्कर्ष, सोलापूर असा चुरशीचा झाला.  अत्यंत चुरशीचा या सामन्यात वेळापूरचा खेळाडू रामजी कशाप्पा व राहुल सावंत यांनी उकृष्ठ संरक्षण करून संघासाठी मोठे योगदान देऊन विजयश्री खेचून आणली तर सोलापूर संघाकडून निखिल कापुरे यांनी चांगला आक्रमणाच्या खेळाचे प्रदर्शन दाखवून उपस्थितांची मने जिंकून व्दितीय क्रमांकाचे परितोषिक पटकावले.

या स्पर्धे करीता सोलापूर अँम्युचर खो-खो असोसीएशन चे सचिव श्री. सुनील चव्हाण ,उपाध्यक्ष- रामभाऊ दत्तू, येताळा भगत सर, अजित शिंदे सर, रविंद्र माशाळकर, कृष्णा कोळी, बबलू शेख यांचे समवेत श्री सिद्धेश्वर आवताडे – युवक नेते,  श्री. शशिकांत बुगडे– मा.चेअरमन –दामाजी शुगर व अशोक केदार – संचालक दामाजी शुगर, श्री. सदाशिव कोळी –उपसरपंच,  राजेंद्र लिगाडे गुरुजी, अशोक कोळी गुरुजी, राजेंद्र केदार गुरुजी, रमेश केदार -मा.ग्रा.सदस्य, श्रीमंत केदार – ग्रा.सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली.

  या सर्व विजेते संघाच्या खेळाडूंचे ए एम स्पोर्ट्सच्या वतीने अभिनंदन केले या स्पर्धा यशस्वी करण्या साठी ए एम स्पोर्ट्सचे मार्गदर्शक व युटोपियन शुगर्स चे स्टोअर अकौंटंट श्री.सुनिल पुजारी, फायनान्स अकौंटंट आमसिद्ध कोरे आणि  संयोजक – आणप्पा बिराजदार, अनिल लिगाडे, रोहित लिगाडे, विठ्ठल बगले  सर, देविदास कोळी, राहुल भोसले, अप्पू बाळगे, प्रमोद आनंदपुरे यांचेसह  डोणज ग्रामस्थांनी परिश्रम घेतले  केले. .

 फोटो ओळी : ए.एम स्पोर्ट्स डोणज ता. मंगळवेढा आयोजित खुला गट खो - खो स्पर्धेत विजेत्या संघाचे अभिनंदन करताना युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांचे समवेत विजेत्या संघाचे खेळाडू व युटोपियन शुगर्स चे स्टोअर अकौंटंट श्री.सुनिल पुजारी, अनिल लिगाडे आदि दिसत आहेत.

Wednesday, November 3, 2021

युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी मजुरांना फळामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप

युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी मजुरांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप

युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी भेट जाहीर करून गळीत हंगाम २०२०-२०२१ करिता एकुण २२००/- रु.प्रमाणे दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून, कामगारांना ही भरघोस दिवाळी बोनस ही दिला आहे.तसेच कारखान्याच्या सभासदांना २५/-रुपये प्रमाणे १० कि.साखर तसेच ज्या ठेवीदारांनी कारखान्याकडे १०,०००/- रुपये ठेव ठेवलेली आहे.अशा सभासदांना सुद्धा २५/-रु प्रमाणे १० किलो साखर घरपोच देण्यात आली आहे.फक्त ऊस उत्पादक व कामगार यांचीच दिवाळी गोड न करता,कारखाना प्रशासनाने ऊस तोडणी मजूर यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना ऊसाच्या फडात जाऊन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्या शुभहस्ते दिवाळी साहित्याचे वाटप केले व शुभेच्छा दिल्या. 
युटोपियन च्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.साखर कारखानदारीमध्ये सर्वात महत्वाची व पहिली पायरी म्हणजे ऊस तोडणी करणारे कामगार असतात.हे कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऐन दिवाळीच्या सणामध्ये आपल्या घरांपासून-नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोडणीचे काम करीत असतात.अशा ऊसतोड कामगारांना दिवाळी साजरी करणे अवघड होते.त्यामुळे त्यांना ही दिवाळी साजरा करीता यावी या उद्देशाने कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले.असा उपक्रम राबविणारा युटोपियन शुगर्स हा परिसरातील कारखान्यामध्ये एकमेव असल्याने कारखान्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो ओळी:-
ऊसतोड कामगारांना दिवाळी साहित्याचे वाटप करताना कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक ,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व ऊस तोडणी कामगार वर्ग दिसत आहे

Sunday, October 10, 2021

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न चालू गळीत हंगामा करिता ६.५० लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक

 



युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

चालू गळीत हंगामा करिता ६.५० लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट उमेश परिचारक

 मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ रविवार दि.१०/१०/२०२१ रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अत्यंत साधेपणाने पण उत्साही वातावरणात साजरा झाला. 

     प्रारंभी कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर श्री.अनिल भोसले यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

     यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की,आपल्या कारखान्याच्या चा हा आठवा गळीत हंगाम असून मागील सात ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केली आहे.चालू गळीत हंगामात ६.५० लाख मे.टन ऊसाचे क्रसिंग करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून सर्व ऊस उत्पादक हे नियोजित नोंदणी प्रोग्रॅम नुसारच कारखान्यास ऊस देतील अशी मला खात्री आहे.

 या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी २०० ट्रॅक्टर, १५० मिनी ट्रॅक्टर,व 20 बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या १५ ते१६ तारखेपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे.

      संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. लवकरच मोळी पूजन करून गळीत हंगामास सुरुवात होईल.त्या निमित्ताने सर्वांना नवरात्री च्या शुभेच्छा दिल्या सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री परिचारक यांनी व्यक्त केली . तसेच कारखान्याच्या व्यवस्थापना मध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक (B.E. Mech., MBA Londan) हे मदत करतील अशी अपेक्षा उमेश परिचारक यांनी व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित सर्वांनीच या घोषणेचे मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून स्वागत केले.

सदर प्रसंगी रोहन परिचारक,प्रगतशील बागायतदार महादेव लवटे,सुरेश टिकोरे,यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

 फोटो ओळी:- युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ करिता आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार महादेव लवटे,सुरेश टिकोरे,यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.


Monday, February 22, 2021

युटोपियन शुगर्स च्या ७ व्या गळीत हंगामाची सांगता, ऊस उत्पादकांच्या विश्वासावरच चालू गळीत हंगामात ५ लाख मे.टन गाळप पूर्ण, कामगारांनाही देणार भरघोस पगार वाढ :- उमेश परिचारक

 


      मंगळवेढा प्रतींनिधी: कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स या कारखान्याच्या ७ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ सोमवार  दि.२२/०२/२०२० रोजी चेअरमन उमेश परिचारक व सर्व खाते प्रमुख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. या चालू गळीत हंगामात युटोपीयन शुगर्स ने ५ लाख मे.टनाचे ऊस गाळप पूर्ण केले आहे.यावेळी वाहन ट्रॅक्टर पूजन कारखान्याने टेक्निकल जनरल मॅनेजर तुकाराम देवकते यांच्या हस्ते करण्यात आले .

         स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हितासाठी युटोपियन शुगर्स या साखर कारखान्यांची निर्मिती केली.ते कारखाने टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे.  आपल्या युटोपियन शुगर्स ने चालू वर्षी कारखान्याने जास्तीचे ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, पुर परिस्थिति मुळे नदीकाठच्या भागातील कारखान्याच्या नोंदीतील ऊसाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी मूळे टनेजमध्ये घट झाली,शेती विभागाच्या नियोजना प्रमाणे ऊस गाळपासाठी थांबण्याची मानसिकता बदलून चालू  हंगामा मध्ये जास्तीचा ऊस असल्यामुळे आपला ऊस वेळेत गाळपास न गेल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होईल या भीतीने मिळेल त्या ठिकाणी ऊस घालवण्याची मानसिकता ऊस उत्पादक यांची झाली आहे. ,अशा परिस्थिति मध्ये ही युटोपियन शुगर्स ने ५,००,००० मे.टन ऊसाचे गाळ्प केले आहे, हंगामाच्या सुरवातीला सलग दोन महिने ८.५% ते ९% इतकी कमी रिकव्हरी मिळाली पुढे त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही व ती १० च्या आसपास राहिली. कारखान्याने एकूण गाळपाच्या ८८% कोएम-०२६५ या जातीच्या उसाचे क्राशिंग केले आहे. ह्या जातीचा ऊस किमान पंधरा महिन्यानंतर गाळपसाठी आणला पाहिजे तरच १०% पेक्षा जास्त रिकव्हरी मिळू शकते. परंतु सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत व त्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा ऊस लागवड कमी प्रमाणात आहे, त्यामुळे साखर कारखान्यामध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा निर्माण होते त्याचा फटका रिकव्हरीला बसतो त्यामुळे सर्वच कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीवर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे. साखरेचा किमान विक्री दर ३६ रु. करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या जिल्ह्यातील कारखानदारी मोडून पडेल. अशा कठीण काळात ऊस उत्पादक यांनी युटोपियन शुगर्स वरती विश्वास टाकून सहकार्य केले बद्दल ऊस उत्पादक यांना, तसेच ऊस तोडणी कामगार, वाहन मालक, कारखान्याचे सर्व सप्लायर, व्यापारी, साखर व्यापारी,कारखान्याच्या प्रगती मध्ये ज्या-ज्या घटकांचा सहभाग आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.

       शासनाने इथेनॉलचे अतिशय उत्तम धोरण निश्चित केले त्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानतो. जास्तीतजास्त साच्या रसापासून इथेनॉल तयार केले पाहिजे पण त्यासाठी आसवानी प्रकल्पात वाढ करण्यासाठी मोठया भांडवलाची गरज आहे,तरच शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होईल. कारखान्याने ४५ केएलपीडी आसवाणी प्रकल्पातून बी - हेव्ही मोलॅसेस पासून इथेनॉल ची निर्मिती करून शासनाकडे इथेनॉल पुरवठया साठी १ कोटी लिटर चे टेंडर ही भरले आहे. त्यानुसार सध्या शासनाच्या तेल कंपनी यांना इथेनॉल पुरवठा चालू आहे . सदर टेंडर नोव्हेंबर २०२१ पर्यंत युटोपियन पूर्ण करणार आहे.

        कारखान्याच्या प्रगती मध्ये कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कष्टावरच या कारखान्याची विविध क्षेत्रा मध्ये प्रगती होत आहे. त्या करीता त्यांची पगार वाढ करणे गरजेचे आहे. मुळात हा कारखाना हा या भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने काढला आहे. त्यामुळे या कारखान्यातील कर्मचारी याची किमान पगार ही ७८०० रु.अशी करण्यात येणार असून सदरची वाढ ही कारखाना प्रशासनाने या पूर्वीच जाहीर केल्या प्रमाणे जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच कामगाराच्या गुणवत्ते नुसार त्यांना ही भरघोस अशी पगार वाढ करण्यात येत आहे. किमान वेतन ठरविणारा युटोपियन हा कदाचित पहिलाच खाजगी साखर कारखाना असेल असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

       आगामी काळात मागील गळीत हंगाम यांचा अभ्यास करता आधिकाधिक जोमाने काम करण्यासाठी आपण सर्वांनी साथ देण्याची गरज असल्याचे मत ही उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

 फोटो ओळी :- युटोपियन शुगर्स च्या २०२०-२१ या ७ व्या गळीत हंगामाची मोळी पूजन करून, गव्हाणीत मोळी टाकून सांगता करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, यांचे समवेत कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

छायाचित्रे  : सागर राजमाने.


Friday, February 19, 2021

युटोपियन शुगर्स येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती आज शुक्रवार दि.१९/०२/२०२१ रोजी युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे कारखाना कार्यस्थळावर मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “जय भवानी जय शिवाजी” या घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी युटोपियन शुगर्स चे डिस्टिलरी वेअरहाऊस सुपर वाईजर मोहम्मद अली पठाण यांनी शिवाजी महाराजांवर तयार केलेली अप्रतिम कविता सादर करून महाराजांना अभिवादन केले. युटोपियन शुगर्स च्या वतीने दर वर्षी मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात येते. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Friday, January 29, 2021

सरकार दाद देईना ...... मा.सर्वोच्च न्यायालया कड़ून इपीएस-95 पेंशनधारकांना मोठी आशा - अविनाश कुटे पाटील.




ईपीएस - 95 जेष्ठ वयोवृद्ध पेंशनधारक यांनी अल्प नाममात्र पेंशन मध्ये उदरर्निवाह व उपजीविका होणे शक्य होत नसल्याने, हायर पेंशन मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत.शासन व खासदार यांचे मार्फ़त अनेक वेळा पाठपुरावा केला ,कोशियारी समिति अहवाल ही शसनाकडे धुळ खात पडला ,यासाठी जेष्ठांनी अंतिम टप्प्यात न्यायालयीन लढा दिला न्यायालयाने आदेश देवून ही सरकार व EPFO सतत अपीलात जात असल्याने जेष्ठांचा या वयात सन्मान न राखता सरकार व EPFO ने हेळसांङ केल्याचे चित्र समोर येत आहे.म्हणून आता मा.सर्वोच्च न्यायालयांच्या दि.29/01/2021 च्या निकालाकड़े EPS 1995 चे जेष्ठ पेन्शनर्स  मोठी अपेक्षा धरुन आहेत.या निकालाचा फायदा सध्या  कार्यान्वित्त असणारे कर्मचारी यांना अधिक सूखकर होणार आहे...

भारतातील सर्व राज्यातील एसटी महामंडळे, साखर कारखाने, सहकारी बँका, भारतीय खाद्य महामंडळ, वन विभाग, राज्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील जवळपास 67 लाख सेवानिवृत्त पेंशन धारक आहेत
        आज आपल्या देशातील सर्व ईपीएस, 1995 गरीब आणि वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारक तसेच त्यांची पत्नी, ज्यांचे वय 60, 80 आणि 90 च्या दशकात आहे, केवळ 50% पेन्शनधारकांना 500 ते 1000 रुपयांपर्यंत आणि 40% वृद्ध निवृत्तीवेतनाधारकांना ईपीएस 1995 अंतर्गत 1000 रुपये ते जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंतच्या मर्यादित रकमेसाठी तुटपुंजे निवृत्तीवेतन मिळते . सुरुवातीला निवृत्तीच्या वेळेस एकदाच हमी दिलेली पेन्शन पेंशनधारकांच्या आयुष्यासह शेवटपर्यंत तशीच राहते, जी कधीही एक रुपयानेही वाढत नाही.  या निवृत्तीवेतनासह महागाई भत्ता दिला जात नाही आणि या कारणास्तव हे सर्व गरीब व वृद्ध पेंशनधारक आणि त्यांच्या बायका स्वत:च्या घरात तसेच समाजात घोर अपमान सहन करीत आहेत आणि असह्य जीवन व्यतीत करीत आहेत.

67 दशलक्ष पेंशनधारक आणि त्यांच्या बायका देखील अशा एक योद्धा आहेत ज्यांनी आपल्या देशाची सेवा मोठ्या प्रमाणावर केली आहे, सेवेत असतांना प्रत्येक महिन्याच्या पगारापैकी ईपीएफओच्या बरोबरच देण्यात आलेल्या कपातीसह सरकारची पेन्शन योजना, भारत सरकारचा प्राप्तिकर, इतर सर्व कर(टॅक्सेस) सह इतर सर्व प्रकारच्या करांनाही न संकोचता किंवा तक्रार न करता योगदान देवून महासत्तेच्या शिखरावर असलेल्या या महान भारत देशापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

      चिंतेची बाब ही आहे की आजच्या काळात आमच्या सरकारने त्यांना अत्यंत वाईट  पद्धतीने आणि कठीण परिस्थितीत जीवन जगण्यास  भाग पडून सततच अक्षम्य अन्याय केल्याचे जाणवत आहे.  
उपजीविका करणे या सर्वांसाठी खूपच अवघड झाले  आहे.आपल्याला हे चांगले ठाऊक आहे की, महागाईच्या या सर्वात कठीण अवस्थेत इतक्या थोड्या पेंशनमध्ये वैद्यकीय उपचार करणे म्हणजेच निवृत्तीशी संबंधित आरोग्य उपचार आणि औषधास देखील अपुरी आहे. 60 वर्ष ते 80 किंवा 90 वर्षे वयोगटातील सर्व दिग्गज वयोवृद्ध आणि गरीब पेन्शनर्स आणि कुटुंबांसह, त्यांच्या जगण्याबद्दल आदर बाळगणे फार दूर आहे.  
परंतु या वाढत्या वयात रोगांचा सामना करावा लागतो.  
याचा परिणाम म्हणून, आज या वाढीचे वयात आणि आजार असूनही या निवृत्तीवेतन धारकांना कुठेतरी ड्रायव्हर व्हावे, कुठेतरी बंगल्यावर पहारा ठेवावा, किंवा कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा बसमध्ये वेळेची भाकरीऐवजी एक वेटर किंवा सफाई कामगार म्हणून जगावे लागत आहे. त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय विसंगत आणि असहाय्य मार्गाने व्यतीत करावे लागत आहे , कारण मृत्यू येत नाही.म्हणून हाल अपेष्टेत  निराशाजनक जीवन व्यथित करावे लागत आहे.

सरकारने जेष्ठांना सन्मान दिला नाही तरी जिद्द हरले नाहीत......

परंतु या जेष्ठ बांधवा जीवनात जगण्याची उमेद न हरता न्यायालयीन लढाई आपल्या सरकार विरुध्द सुरु मोठ्या जिद्दीने चालू ठेवली आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालयात श्री.  आर.सी. गुप्ता व इतरांच्या बाबतीत, माननीय सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवला आहे . यासह, माननीय केरळ उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबर 2018 रोजी  ईपीएस 1995 पेन्शनधारकांच्या बाजूने निर्णयही मंजूर केला आहे की,
 ईपीएफओने 1/09/2014 रोजी बेकायदेशीर दुरुस्ती करने अयोग्य होय.ईपीएफओ पेन्शनर्सचा पेन्शनयोग्य वेतन निश्चित करण्यासाठी, या बेकायदेशीर दुरुस्तीनंतर निवृत्तीवेतनधारकांचा मागील 60 महिन्यांचा पगार वेतन काढून अन्याय केला.माननीय केरळ उच्च न्यायालयाने ही तरतूद नाकारली आहे.  आणि या कारणासाठी केवळ मागील 12 महिन्यांच्या पगारावरच पेन्शनयोग्य वेतन सरासरी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. पण EPFO ने या निकालाचे पालन करण्याऐवजी मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली गेली होती, परंतु त्यात माननीय केरळ उच्च न्यायालयाच्या 12 ऑक्टोबर 2018 च्या आदेशाला 01 एप्रिल 2019 रोजी नामंजूर करत स्थगिती देण्यात आली आहे.
 परंतु ही अत्यंत दु: खाची बाब आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही निकालांचे पालन करण्याऐवजी पुन्हा हटवादी धोरण स्वीकारत मागील वर्षी परत सुधारित याचिका दाखल केली गेली.
आमच्या स्वत:च्या पेन्शन फंडातून कोट्यावधी रुपये खर्च करणारे ईपीएफओ नवी दिल्ली कार्यालय नेहमीच आमच्याविरुध्द वेगवेगळ्या न्यायालयेमध्ये अपील आणि याचिका दाखल करत असते.आणि असे लक्षात घेण्यासारखे आहे की अशी अनेक डझनभर प्रकरणे आणि कोट्यवधी रुपये खर्चूनही  ईपीएफओच्या नवी दिल्ली कार्यालयाने,संपूर्ण कालावधीसाठी एक खटलाही जिंकल्याचे ऐकिवात नाही.

स्व:कार्यालयसाठी सर्व मान्य,ग्राहकासाठी मात्र अड़चन...

केंद्र सरकारतर्फे ईपीएफओचे आयुक्त, अधिकारी व कर्मचार्‍यांना वैद्यकीय भत्ता मिळालेली पगार आणि उच्च पेन्शन योजना 1995 च्या आमच्या स्वत:च्या पेन्शन पेन्शन फंडातूनही चालविली जात आहे. परंतु जेव्हा वृद्ध, गरीब पेंशनधारक यांना हायर पेंशन देण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र  प्रत्येकजण, ईपीएफओच्या कार्यालयासमवेत, कायदेशीर प्रक्रिया पुढे ढकलण्यात स्वत: ला नेहमी धन्य मानतात.

जेष्ठांची अपेक्षा....

* किमान जीवन जगण्याइतपत तरी किमान 9000 हजार रुपये मासिक पेंशनसोबत सतत वाढ़ना-या महागाईवर आधारित पेंशन द्यावी.

*पतीचे निधना नंत्तर विधवा सुध्दा पत्नीस 100 टक्के पूर्ववत पेंशन चालू रहावी.

*मेडिकल व आजारपणाचा विमा किंवा भत्ता लागू व्हावा

*कोशियारी समितीच्या शिफारसी 100 टक्के लागू कराव्यात.

लेखन

 अविनाश कुटे पाटील (नेवासकर)
 9226428756
 ईमेल पत्ता
 Kutepatil02@gmail.com