Monday, December 23, 2019

युटोपियन शुगर्स च्या १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न




युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या २०१९-२० या गळीत हंगामातील १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन सोमवार दि. २३/१२/२०१९ रोजी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या  विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे, चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित  होता.
    यावेळी बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा,बुलढाणा अर्बन को- ऑफ क्रेडिट सोसायटीच्या विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे यांचा सत्कार कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
      या वेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित परिषदे मध्ये पूर्वीची शिवनेरी अर्बन बँक व सध्याची पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे सो यांचे अभिनंदन युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी केले. या वेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,मागील दोन वर्षांपासून युटोपियन शुगर्स ला बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चांगले सहकार्य लाभले असून, भविष्यात ही असेच किंबहुना याही पेक्षा जास्त सहकार्य लाभेल अशी आशा वाटते. त्याच प्रमाणे त्यांच्या पुणे कमर्शियल बँकेनेही बँकिंग क्षेत्रामध्ये चांगले नाव कमविले असून त्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले आहे. बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे साहेब यांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. युटोपियन शुगर्स च्या वतीने  मी या बद्दल त्यांचे अभिनंदन करतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.
      पुढे बोलताना परिचारक म्हणाले की¸सध्या सबंध जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिति असून  कारखानदारी अडचणीत आहे.सर्वात जास्त साखर कारखाने असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात काही मोजकेच कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत. काही कारखाने कमी क्षमतेने चालविण्यात येत आहेत तर बहुतांश कारखाने बंद आहेत परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा युटोपियन शुगर्स ने आपल्या कामगिरीच्या जोरावर ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये अपेक्षित अशी कामगिरी करीत आहे. चालू गळीत हंगामा मध्ये ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. तसेच ऊस उत्पादकांनी ऊस दराबाबत
निश्चिंत राहावे एफआरपी पेक्षा ही जास्तीचा दर देण्याची आपली परंपरा युटोपियन या ही वर्षी कायम राखणार आहे.तरी ऊस उत्पादकानी आपला ऊस युटोपियन ला गाळपास देऊन कारखाना प्रशासनास सहकार्य करावे,तसेच ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही असे मत श्री परिचारक यांनी व्यक्त केले.
     
सत्काराला उत्तर देताना पुणे कमर्शियल बँकेचे  चेअरमन व बुलढाणा अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की,सध्या महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी अडचणीत असून युटोपियन शुगर्स ने मात्र,अडचणीच्या काळातही आपली गुणवत्ता जपली आहे.त्यामुळेच या पुढील काळातही आम्ही या कारखान्यास करीत असणारे सहकार्य कायम ठेवणार असून युटोपियन शुगर्स सारखे ग्राहक आमच्या संस्थेस मिळणे ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे.   
   यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की दुष्काळी परिस्थितीवर मात करत युटोपियन शुगर्स  ने २६व्या दिवसा अखेर १,००,८०० मे.टन.इतक्या ऊसाचे गाळप करीत१०११११.इतके क्विंटल साखर उत्पादन केले आहे.तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८७ लाख इतके युनिट वीज निर्मिती केली असून  ५५.५० लाख युनिट इतकी वीज निर्यात केली आहे. सदरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी युटोपियन ची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमेतेने कार्यरत आहे.
फोटो ओळी :
१)       युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या २०१९-२० या गळीत हंगामातील १,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन प्रसंगी बुलढाणा अर्बन कों-ऑफ क्रेडिट सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे कमर्शियल बँक,कोरेगाव या बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे,व मुंबई येथील उद्योजक पंकजभाई शहा, बुलढाणा अर्बन च्या विभागीय व्यवस्थापिका योगिनी पोकळे¸कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व इतर मान्यवर दिसत आहेत.
2)राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित परिषदे मध्ये पूर्वीची शिवनेरी अर्बन बँक व सध्याची पुणे कमर्शियल बँक कोरेगाव या बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल बँकेचे चेअरमन शिरीष देशपांडे सो यांचे अभिनंदन करताना युटोपियन शुगर्स कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील दिसत आहेत.
(सर्व छायाचित्रे : सागर राजमाने)


Tuesday, December 10, 2019

शिकणार्‍यांसाठीचा धडा-भाऊ तोरसेकर

Image result for kumarswamy swearing in

कर्नाटक विधानसभेच्या १५ मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक महाराष्ट्रातील नव्या सरकारसाठी मोठा धडाच आहे. अर्थात धडा शिकणार्‍यांसाठी असतो. ज्यांना शिकायचा नसतो, त्यांच्यासाठी त्याचा काहीही उपयोग नसतो. महाराष्ट्रात आज जे सरकार सत्तेत आहे, ते अंकगणितावर आधारलेले सरकार आहे. त्याच्यापाशी निर्विवाद बहूमत आहे. दिड वर्षापुर्वी कर्नाटकातही अशीच स्थिती होती आणि निकालानंतर एक अंकगणिती लोकशाहीचे सरकार स्थापन करण्यात आलेले होते. तिथे सिद्धरामय्यांचे कॉग्रेस सरकार निवडणूकीला सामोरे गेले होते आणि त्याच्या पाच वर्षाच्या कारभारावर जनतेने आपले मतप्रदर्शन केलेले होते. त्यात कॉग्रेसला १२० हून अधिक आमदारांवरून ७८ इतके खाली यावे लागलेले होते. याचा अर्थ कॉग्रेस पक्ष सत्तेत नको, असाच स्पष्ट कौल मतदाराने दिलेला होता. पण भाजपाला सर्वाधिक जागा जिंकताना बहूमताचा पल्ला ओलांडता आलेला नव्हता. अशावेळी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या जनता दल सेक्युलर पक्षालाही कॉग्रेस विरोधातील मते मिळाली होती. म्हणूनच त्यांनी भाजपासोबत जाऊन जनतेला हवे असलेले बिगर कॉग्रेस सरकार देणे संयुक्तीक ठरले असते. पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह पडला होता आणि कॉग्रेसच्या निम्मे आमदार असूनही कॉग्रेसने कुमारस्वामी यांच्या जनता दल पक्षाला पाठींबा देऊन संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आमिष दाखवले. भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे हा त्यांचा किमान समान कार्यक्रम झाला आणि वर्षभर दोघे सत्तेत होते. यात भाजपाला काय वाटले, हा भाग वेगळा. जनतेला काय वाटले वा वाटते, त्याला महत्व असते.

आज महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे शरद पवार म्हणत आहेत, की मतदाराने भाजपाला इथल्या विधानसभेत नाकारले. नेमके तेच व तसेच शब्द त्यावेळी २०१८ च्या मे महिन्यात तमाम पुरोगामी बुद्धीमंत विश्लेषक वापरत होते आणि भाजपाला सत्तेबाहेर बसवण्याचे गुणगान करण्यासाठी देशातले तमाम विरोधी पक्ष नेते बंगलोरला जमलेले होते. हात उंचावून त्यांनी मतदाराला अभिवादन केले होते. तर मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधींचे पुण्यात्मा म्हणून गुणगान केलेले होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी डोळ्यांना रुमाल लावून श्रोत्यांसमोर रडत आपल्याला कॉग्रेसने कारकुन व चपरासी बनवून सोडले असल्याचे रडगाणे गायला आरंभ केला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे अजून सहा मंत्र्यांना आपापली खातीही वाटू शकलेले नाहीत. दोघांमध्ये कुठला गुणात्मक फ़रक आहे, तो प्रत्येकाने आपली बुद्धी वापरून शोधावा. पण दिड वर्षापुर्वी कर्नाटकात जे अंकगणित सोडवले गेले होते, ते फ़क्त दहा महिन्यातच तिथल्या मतदाराने पुसून टाकले. एकत्रित लढूनही कॉग्रेस सेक्युलर जनता दलाला लोकसभेच्या निवडणूकीत जमिनदोस्त करून टाकले होते. तिथून मग त्या पुरोगामी सरकारला घरघर लागली होती. मतदाराने नाकारलेल्या सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी त्या पुरोगामी सत्ताधारी गटातून आमदारांची पळापळ सुरू झाली. एक एक आमदार आपल्या पदाचा राजिनामा देऊन भाजपात सहभागी होण्यासाठी रांग लावू लागले. त्यांना रोखण्यासाठी कॉग्रेसने सुप्रिम कोर्टापासून सभापतींचे अधिकारही पणाला लावले. पण काय हाती लागले?

खरे तर निकालानंतर एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रकार नवा नाही. पण ज्या पक्षाच्या बाजूने मतदाराचा अधिक कौल आहे, त्यालाच बाहेर बसवून केलेल्या आघाड्या व युत्यांची सरकारे मतदाराने फ़ार काळ चालू दिलेली नाहीत, हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. त्याला दडपून विश्लेषण करता येते. पण ते सत्य ठरत नाही. जेव्हा बाजी मतदाराच्या हातात येते, तेव्हा तो कुठल्याही बलदंड पक्षाला धडा शिकवित असतो. त्याचीच कर्नाटकात प्रचिती आलेली आहे. वास्तविक लोकसभा निकालानंतर कुमारस्वामी सरकार विरोधातला जनमताचा कौल स्पष्ट झाला होता आणि तेव्हाच त्यांनी सत्तेचा मोह सोडायला हवा होता. पण कसेही करून सत्तेला चिकटून रहाण्यासाठी जी लाजिरवाणी धडपड या पक्षांनी केली; त्याची किंमत आता मोजली आहे. आमदार राजिनामे देऊन बाजूला झाल्यावर त्यांना जबरदस्तीने आपल्याच बाजूला राखण्यासाठी सुप्रिम कोर्ट व सभापती पदाचे अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. तरीही विश्वास प्रस्तावाचे नाटक तीन दिवस रंगवण्यात आले. तुम्ही बहूमत गमावलेले आहे, हे जगजाहिर होते. तरी कुमारस्वामी व सिद्धरामय्या यांनी त्या प्रस्तावावर चारचार तास भाषणे करून चार दिवस सरकार टिकवले. मजेची गोष्ट म्हणजे विश्वास प्रस्तावावर विरोधी भाजपाचा कुठलाही सदस्य चकार शब्द बोलला नाही आणि चर्चा तीन दिवस चालवली गेली. हा निव्वळ बेशरमपणा व लोकशाहीची केविलवाणी थट्टा होती. ती करण्यातून कॉग्रेस व जनता दलाने जी पत घालवली, त्याचेच प्रतिबिंब ताज्या निकालात पडलेले आहे. आज भाजपाचा विजय अजिबात झालेला नाही, त्यापेक्षा तो पुरोगामी लांडीलबाडीचा झालेला दारूण पराभव आहे,

सत्ता टिकवण्यासाठी व बळकावण्यासाठी कुठल्या टोकाला जाऊन पुरोगामी लोक युक्तीवाद करतात, त्यावरचा मतदाराने व्यक्त केलेला हा राग आहे. त्यात कर्नाटकच्या मतदाराने भाजपाच्या कामासाठी पाठ थोपटली असे नक्की म्हणता येणार नाही. पण सत्तालालसा पुरोगाम्यांची इतकी नागडी उघडी पडली, की त्यांच्या तुलनेत भाजपा बरा असेच मतदाराला वाटल्याचा हा निकाल आहे. कर्नाटकात तरी जनता दल व कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि दोघांना भाजपाच्या विरोधात मते मिळालेली होती. इथे महाराष्ट्रात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपाच्या सोबत महायुती म्हणून मते मागितलेल्या शिवसेनेने मतदाराच्या कौलाची थेट पायमल्ली केलेली आहे. तिथे भाजपा मोठा पक्ष असून त्याला सत्तेबाहेर बसवणारे दोघेही भाजपाच्या विरोधातले होते. इथे मतदाराला भाजपा सोबत सरकार बनवण्याचे आश्वासन देऊन लढलेली शिवसेनाच भाजपाला सत्तेबाहेर बसवण्यासाठी दोन्ही कॉग्रेसशी हातमिळवणी करून बसलेली आहे. मग उद्धवरावांनी आपल्या वडीलांना दिलेला शब्द जरूर पाळला आहे. पण कालपरवा आक्टोबर महिन्यात मतदाराला दिलेल्या शब्दाचे काय? त्याच्या विश्वासाची पायमल्ली केलेली नाही काय? तो मतदार टेलिव्हीजनच्या स्टुडीओत येऊन प्रतिवाद किंवा युक्तीवाद करत नसतो. पण प्रत्यक्ष मतदान असते, तेव्हा तो आपला हिसका दाखवतो. म्हणूनच आज निकाल कर्नाटकातील पोटनिवडणूकांचे लागलेले आहेत. पण त्यात महाराष्ट्रातील विविध पक्षांसाठी मोठाच धडा सामावलेला आहे. ती येऊ घातलेल्या भविष्याची चाहूल असते. पण कान बंद करून बसलेल्यांना आक्रोश कुठून ऐकू येणार म्हणा.