Saturday, March 9, 2019

युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळप पूर्ण,कामगारांना देणार १५ दिवसाचा बक्षीस पगार :- उमेश परिचारक


युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळपपूर्ण,कामगारांना देणार १५ दिवसाचा  बक्षीस पगार :- उमेश परिचारक
गळीत हंगाम २०१८-२०१९ चा सांगता समारंभ संपन्न
मंगळवेढा:- युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने चालू गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये मागील ४ वर्षाचा विक्रम मोडीत काढत उच्चांकी कामगिरी केली आहे. कारखान्याने १३७  व्या दिवसा अखेर ६३२३११ मे.टन ऊसाचे गाळप करीत सरासरी १०.१५ % इतक्या साखर उतार्‍यासह ६४१६०० क्विंटल इतके साखर उत्पादन केले आहे. तसेच को-जन प्रकल्प अद्याप ही चालू असून दिनांक ०८/०३/२०१९ अखेर प्रकल्पातून ४.९१.कोटी यूनिट वीज निर्मिती करून ३.२४. कोटी यूनिट इतकी वीज निर्यात केली आहे.कारखान्याच्या या विक्रमी कामगिरीमध्ये कामगार वर्गाचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांना १५ दिवसांचा पगार हा बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन मा.श्री उमेश परिचारक यांनी केली  .
   प्रारंभी युटोपीयन चे डेप्युटी चीफ केमिस्ट श्री दीपक भगवान देसाई यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण पुजा करण्यात आली. कार्यक्रमाचा गाजवजा न करता युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील आदींच्या शुभहस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून गळीत हंगाम २०१८-२०१९ ची सांगता करण्यात आली. सदर प्रसंगी सर्व खाते प्रमुख,अधिकारी, कर्मचारी,ऊस उत्पादक,तोडणी-वाहतूकदार उपस्थित होते.
     स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे  संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, ऊस उत्पादकांना भेडसावणारा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युटोपीन ची निर्मिती करण्यात आली.गळीत हंगामाच्या सुरूवातीस ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती. मात्र.,हुमणी मुळे बर्‍याच ऊस उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होऊन ऊस क्षेत्रा मध्ये ही मोठ्या प्रमाणात घट झाली. अशा ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याच्या वतीने तातडीने विविध प्रकारची औषधे,खते, तसेच प्रशिक्षण देण्यात आले होते. चालू वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिति असतांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्यवस्थापन तसेच कार्यक्षम शेती विभाग,ऊस उत्पादक व कर्मच्यार्‍यांच्या योगदानामुळेच चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळप करीत युटोपियन शुगर्स ने एक नवा विक्रम निर्माण केला आहे. कारखान्याची निर्मिती ही मुळातच ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन केलेली असल्याने कारखान्याने मागील चार ही वर्षी एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर दिलेला आहे.चालू वर्षी केंद्र शासनाने साखर कारखान्यांना मदत करण्याच्या उद्देशाने साखरेची किमान  विक्री किंमत जाहीर केली सध्या MSP ( Minimum Selling Price ) ३१०० रुपये अशी आहे मात्र. चालू वर्षी साखरेचे अधिकचे उत्पादन झाल्याने बाजार पेठेत साखरेस समाधान कारक मागणी नाही. तरीही युटोपियन ने जानेवारी २०१९ अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता २००० रु.प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केला आहे. उर्वरित बिलाची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे युटोपियन शुगर्स हा ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन योग्य तो दर देण्यास नेहमीच प्रयत्नशील असतो. तसेच हंगाम यशस्वी करण्यामध्ये कामगार वर्गाचे योगदान महत्वाचे असल्याने कामगारांना प्रोत्साहनात्मक बक्षिस म्हणून १५ दिवसाचा पगार देणार असल्याचेही  परिचारक यांनी जाहीर केले. तसेच कारखाना तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित चालविल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा कारखाना प्रशासन व कर्मचारी वर्ग यांचे वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
      यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, शून्य पाणी वापर तत्वावर आधारीत नावीन्यपूर्ण अशा पांडुरंग परिवारातील एक घटक असणार्‍या युटोपियन शुगर्सने आपल्या कामगिरीतून अल्पावधीतच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केल्याने व  ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने परिसरातील व परिसरा बाहेरील ऊस उत्पादकांनी सुद्धा यूटोपीयन ला गाळपास ऊस उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याने एवढे विक्रमी गाळप आम्ही करू शकलो.चालू गळीत हंगामात ७ लाख.मे.टन ऊस गाळप करण्याचा आमचा मानस होता.परंतु पावसाची अनिश्चितता व त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितिमुळे ऊसाची उपलब्धता कमी झाली व सरासरी उत्पादन ही चालू गळीत हंगामामध्ये कमी झाले आहे. तरीही ऊस उत्पादकांचे नुकसान होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेत नोंदी प्रमाणे ऊस गाळपास आणून सदरचे उच्चांकी गाळप पूर्ण करण्यात आले.  चालू गळीत हंगाम च्या सुरूवातीला कारखान्यांच्या तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये अल्पसा बदल करून आधुनिकीकरण केले त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षमते मध्ये लक्षणीय वाढ झाली त्याच्या फायदा घेत युटोपीयन ने गत हंगामा पेक्षा सरासरी ६९१ मे.टन. प्रतिदिवस या प्रमाणे जास्तीचे गाळप चालू हंगामात केले.केंद्र शासनाच्या धोरणास अनुसरून इथेनोल निर्मिती करीता कारखान्याने बी- हेवी मळी ची निर्मिती केली आहे. त्यामुळे गत हंगामा पेक्षा चालू गळीत हंगामा मध्ये रिकव्हरी अल्पशी कमी झाली आहे. हा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार,यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांचे आभार मानत पुढील काळात ही त्यांचे असेच सहकार्य लाभेल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच ४५ केएलपीडी क्षमतेच्या आसवानी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या शून्य पाणी वापर तत्वावरील नावीन्यपूर्ण अशा आसवानी प्रकल्पाचे लवकरच उदघाट्न करून प्रकल्प कार्यान्वित करणार असून या प्रकल्पा मुळे भविष्यात ऊस उत्पादक यांना चांगला फायदा होणार असल्याचे मत ही पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.तसेच पुढील वर्षी युटोपियन शुगर्स कडून निडवा पिकासाठी १०० रुपये प्रती टन अनुदान  देण्यात येणार असल्याची माहिती श्री.पाटील यांनी दिली.
 यावेळी सर्वाधिक प्रथम ३ क्रमांकाचे तोडणी व वाहतूकदार यांचा सत्कार करण्यात आला.